भद्रावती:- येथील पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत अट्टल मोटारसायकल चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सव्वा चार लाखांच्या ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या निर्देशानुसार आणि वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी व भद्रावती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिस अंमलदार शशांक बदामवार यांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील हनुमान नगर येथील कुख्यात मोटारसायकल चोर गणेश प्रल्हाद आडे (३२) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने चंद्रपूर शहर, रामनगर, भद्रावती व वणी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ११ मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली. या सर्व मोटारसायकली त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत ४ लाख २५ हजार एवढी आहे. पुढील तपास सुरू आहे.