Top News

उमेदवारी न दिल्यास तेली समाजाचा निवडणुकीवर बहिष्कार #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा क्षेत्र तसेच ब्रम्हपुरी, चिमूर, वरोरा आणि बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात तेली समाजाला उमेदवारी न दिल्यास जिल्ह्यातील तेली समाज निवडणुकीवर बहिष्कार टाकेल, असा इशारा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या पत्रपरिषदेत नव्याने नियुक्त झालेले राज्य उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी दिला आहे. आम्ही सार्‍याच पक्षाला विनंती करू, जे पक्ष तेली समाजाला उमदेवारी देतील त्याच पक्षाला मतदान केले जाईल, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची राज्यस्तरीय कार्यकारिणी सभा 10 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली झाली. या सभेत नियुक्त झालेले चंद्रपूर जिल्हाध्यक्षपदी अजय वैरागडे, युवा जिल्हा अध्यक्ष निलेश बेलखेडे, युवा जिल्हा कार्याध्यक्ष आशिष देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष श्रृती घटे यांचीही या पत्रपरिषदेत उपस्थिती होती. संभाजीनगरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे, राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगड या राज्यांनी तेली समाजाला तेली घाणी महामंडळ स्थापित करून दिले आहे, त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेदेखील श्री संताजी तेली घाणी महामंडळ स्थापन करून द्यावे.

महाराष्ट्रातील सर्व समाजांची जातनिहाय जनगणना करावी व त्या-त्या जातीसंख्येनुसार त्यांना योग्य प्रमाणात आरक्षण द्यावे तसेच 50 टक्के आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकारकडून विधेयक मंजूर करून वाढविण्यात यावी. श्री. संताजी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून त्याकरिता 1000 कोटीचा निधी उपलब्ध करून द्यावा. मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. परंतु, ओबीसींच्या तुटपुंज्या मिळणार्‍या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र वेगळे आरक्षण द्यावे. मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याकरिता जी समिती नेमण्यात आलेली आहे ती समिती रद्द करावी व मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश करण्यासाठीचे दाखले देऊ नये. मुंबई येथे तेली समाज भवनासाठी 4 एकर जागा अल्प किंमतीत उपलब्ध करून द्यावी.

ओबीसी प्रवर्गाला आरक्षण सध्या मिळत आहे त्यातील तेली प्रवर्गाला वेगळे आरक्षण करून द्यावे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी वसतिगृह सुरू करावीत, शालेय अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तकात संत श्रीसंताजी जगनाडे महाराज यांचा धडा असावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सुरू केलेली विश्वकर्मा योजना यामध्ये तेली समाजाचा समावेश करावा, असे महत्वाचे ठराव पारित करण्यात आल्याचे देवतळे यांनी यावेळी सांगितले. गरज पडल्यास याबाबत निवेदन देणे, आंदोलने करणे, उपोषण करणे व सर्व ओबीसी एकत्रित आणून ओबीसींवर होणार्‍या अन्यायाबाबत रस्त्यावर उतरण्याचीसुद्धा समाजाची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने