आणि माझ्या बाबाला घरी परत पाठवा!


आत्महत्या करणाऱ्या बापाच्या चिमुकलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र


हिंगोली:- राज्यात एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच दुसरीकडे मराठवाड्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येने डोकं वर काढले आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्या आत्महत्या करणाऱ्या चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहत तिच्या भावना मांडल्या आहेत. त्या चिमुकलीचे ते पत्र सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.



दुष्काळी विभाग म्हणून विदर्भ-मराठवाड्याची ओळख आहे. याच मराठवाड्यात यंदा पावसाने अवकृपा दाखवल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. हाती आलेले पिकातून लागवडीचा खर्चही निघाला नसल्याने कर्जबाजारी शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडत आहे.


अशातच हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्‍यातील शेतकरी नारायण खोडके यांनी पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने तसेच अवेळी पाऊस आणि त्यातच कर्जाचा डोंगर. या सगळ्याला कंटाळून आत्महत्या करत आयुष्य संपवले. मात्र, आत्महत्या केल्याने त्यांच्या परिवारावर आणखीनच दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे.



या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातून आठव्या वर्गात शिकत असलेल्या चिमुकली किरण खोडकेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून परिस्थिती सांगितली. या चिमुकलीने आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हटले की, तुमचा दसरा चांगला गेला असेल आणि दिवाळी देखील चांगली जाईल. पण आमच्या घरी दसरा ना दिवाळी. आई सतत रडत असते. सोयाबीनला भाव असता, तर तुझा बाबा वारला नसता, असे आई सांगते.


घरातून गेलेला बाबा पुन्हा आलाच नाही. आजीला विचारले तर ती म्हणते बाबा देवा घरी गेला. सर देवाचं घर कुठे आहे त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबाला लवकर लवकर पाठवा. लवकरच दिवाळी आहे आणि मी आणि माझा दादू वडिलांची रोज वाट पाहत आहे, पण ते येत नाही.


आता आम्हाला रिसोडच्या बाजारात कोण कपडे घेऊन देणार, असा सवाल देखील या पत्रामधून या चिमुकलीने केला आहे. लोक सांगतात सरकारमुळे तुझा बाबा देवा घरी गेला, हे खरं आहे का? देवाला सांगून माझ्या बाबाला परत आमच्याकडे पाठवा. बाबाला म्हणा तुमची दीदी खूप रडतेय. मग ते लवकर येतात, असे वेदनादायी पत्र या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने