महावितरणचा उपकार्यकारी अभियंता एसीबीच्या जाळ्यात #chandrapur

Bhairav Diwase
0



गडचिरोली:- वीज मीटर फॉल्टी असल्याचे सांगून आकारलेला दंड कमी केल्याचा मोबदला म्हणून एका ग्राहकाकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज आलापल्ली येथील महावितरणचा उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारकर्त्या ग्राहकाचे घरगुती वीज मीटर फाल्टी असल्याने २ लाख २० हजार रुपये दंड भरावा लागेल, असे उपकार्यकारी अभियंता विनोद भोयर याने सांगितले. पुढे दंडाची रक्कम कमी करुन ती ७३ हजार ६९८ रुपये एवढी केली. मात्र, दंड कमी केल्याचा मोबदला म्हणून भोयर याने तक्रारकर्त्या ग्राहकास ४० हजारांची मागणी केली. पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची मूळीच इच्छा नसल्याने ग्राहकाने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सापळा रचून विनोद भोयर यास ग्राहकाकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, पोलिस निरीक्षक शिवाजी राठोड, सहायक फौजदार सुनील पेद्‌दीवार, हवालदार नत्थू धोटे, राजेश पद्मगिरवार, किशोर ठाकूर, संदीप उडाण यांनी ही कारवाई केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)