चंद्रपूर:- उद्या वाढदिवस आहे, तो कसा साजरा करायचा असा बेत आखत असताना वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्याला मृत्यूने कवटाळले. तलावाच्या पाळीवर झोपलेल्या या युवकाचा तलावातच बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. नितेश नत्थुजी मानगुडधे (३०, रा. गुडगाव) असे मृताचे नाव आहे.
वीज वितरण कंपनीच्या वरोरा विभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या वरोरा तालुक्यातील नागरी येथील वीज वितरण केंद्रावर नितेश नत्थुजी मानगुडधे हा तंत्र निदेशक या पदावर कार्यरत होता. तो मूळचा भद्रावती तालुक्यातील गुडगाव येथील रहिवासी होता. नितेश गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना एक अपघात झाला. त्या अपघातात त्याला आपला हात गमवावा लागला. कार्यालयीन कामकाज काही वर्षापासून तो एकाच हाताने करीत होता. नितेश विवाहित होता. मंगळवारी तो काही कामानिमित्त वरोरा शहरात आला होता.
वरोरा शहरातील मध्यभागी असलेल्या तलावाच्या पाळीवर वडाच्या झाडाखाली तो झोपला होता. झोपेतच तो पाळीवरून तलावात पडला. एकच हात असल्यामुळे त्याला आपला बचाव काही करता आला नाही. त्यामुळे तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.
नितेशचा १ नोव्हेंबरला वाढदिवस होता. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर वाढदिवसाच्या दिवशीच त्याच्यावर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैव प्रसंग त्याच्या कुटुंबावर आला. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.