कोळसा व्यावसायिकाच्या कार्यालय, निवासस्थानी छापे; आयकर विभागाची कारवाई #chandrapur #incometax

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरातील कोळसा तथा ट्रान्सपोर्ट व्यावसायिक चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसीतील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालयावर एकाच वेळी आयकर विभागाच्या शंभर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने छापा टाकल्याने कोळसा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या छाप्यात काही कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्याची माहिती आहे. आयकर विभागाच्या पथकाने नागपुरातील व्यावसायिकांच्या निवासस्थानी काही दिवसांपूर्वी छापे टाकले होते. तेव्हा तिथे चढ्ढा यांच्या सोबतच्या कच्च्या व्यवहाराच्या पावत्या मिळाल्या होत्या. याच पावत्यांच्या आधारावर माहिती गोळा केल्यानंतर आयकर विभागाने बुधवारी पहाटेच्या सुमारास चढ्ढा यांच्या चंद्रपूर एमआयडीसी येथील कार्यालय तथा नागपुरातील कार्यालय, निवासस्थान येथे छापा टाकला. यावेळी घरातील व कार्यालयातील सर्वांचे भ्रमणध्वनी ताब्यात घेण्यात आले. तसेच कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

मागील आठ ते दहा वर्षांपासून चढ्ढा कोळसा व्यवसायात आहेत. अल्पावधीतच त्यांनी मोठी मजल मारली. या सर्व व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वी चढ्ढा यांच्या कार्यालय तथा निवासस्थानी जीएसटी पथकानेही छापा टाकला होता. त्यानंतर आता आयकर विभागाच्या कारवाईमुळे चर्चांना पेव फुटले आहे.