ना.सुधीर मुनगंटीवार करणार नागरिकांच्या तक्रारीचे निवारण#chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर येथील नियोजन भवनात "महाजनसंपर्क" चे आयोजन

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या निकाली काढण्याकरीता राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार हे ‘महाजनसंपर्क’ घेणार आहेत.

शुक्रवार, १ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०४ ते रात्री ०८ वाजेपर्यंत ना. श्री. मुनगंटीवार प्रत्यक्ष नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. नियोजन भवन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींबाबत ते जिल्ह्यातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देणार आहेत.

आपल्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी नागरिक वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या कार्यालयांच्या फेऱ्या मारत असतात. परंतु अनेकदा त्यांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे त्यांची गैरसोय होते. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना अशा गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यातून ते शुक्रवारी ‘महाजनसंपर्क’ घेणार आहेत. या महाजनसंपर्काचा जिल्ह्यातील समस्त शेतकरी, महिला, विद्यार्थी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.