चिमूर:- तालुक्यातील पिपर्डा येथील एका युवकाने गुराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. १७) दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. राहुल पटवाळी मेश्राम (२४) असे मृतकाचे नाव आहे.
राहुल मेश्राम हा युवक खडसंगी येथील आपल्या बहिणीकडे राहून पेंटिंगचे काम करीत होता. सोमवारी (दि. १५) तो आपल्या पिपर्डा येथील घरी आला. त्याचे आई-वडील मजुरीकरिता नाशिकला गेले होते. संक्रांतीनिमित्त तेही खडसंगी येथे मुलीच्या घरी आले. राहुल हा पिपर्डा येथे आल्यानंतर आपल्या घरी न थांबता मोठ्या वडिलाकडे मुक्कामी होता. मोठ्या वडिलाच्या कुटुंबातीलही सर्वजण मजुरीसाठी बाहेरगावी गेले. ही संधी साधून राहुलने गुराच्या गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गावकऱ्यांनी कुटुंबीय व पोलिसांना दिली. चिमूर ठाण्याचे विलास निमगडे, तिराणकर, घोन्नाडे यांनी घटनेचा पंचनामा केला.