पोंभूर्णा:- सध्या संपूर्ण भारत राममय झाले आहे. ५०० वर्षानंतर अयोध्येत रामाचे मंदिर उभे होवून रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली आहे. आपल्या रामाला डोळा भरून बघण्यासाठी व दर्शन घेवून आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून रामभक्त अयोध्येला जात आहे.
पोंभुर्णा तालुक्यातील बीएससीचे (कृषी) शिक्षण घेतलेला आणि मूर्ती व मंदिर कलेचा अभ्यासक असलेला सायकलपटू मयूर महादेव देऊरमल्ले हा सायकलने अयोध्या येथे रामलल्लांच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. यासाठी त्याने शनिवार, दि. १९ जानेवारीला चंद्रपूर येथून प्रवास सुरू केला होता. तो दहा दिवसांत चंद्रपूरपासून एक हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून अयोध्येला पोहोचला आहे.