गडचिरोली:- शेतात कापूस वेचण्याचे काम करीत असताना वाघाने एका महिलेवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिला ठार झाली आहे. ही घटना दि.७ जानेवारी दुपारी गडचिरोलीतील अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथे घडली. सुषमा देविदास मंडल (५५) असे मृत महिलेचे नाव आहे.
चिंतलपेठ येथे गोंदूबाई दुर्गे यांच्या घरानजीकच्या शेतात कापूस वेचण्याचे काम सुरु आहे. सुषमा मंडल ही महिला कापूस वेचण्यासाठी गेली होती. सुषमा मंडल व अन्य एक महिला कापूस वेचत असताना अचानक वाघाने हल्ला केला. दोघींनी आरडाओरड केल्यानंतर वाघाने पुन्हा जोरदार हल्ला केला. यात सुषमा मंडल ही महिला जागीच ठार झाली. घटनेनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला.