भिवंडी:- शहरातील धामणकर नाका येथे बँकेतून पैसे काढून रिक्षासाठी उभ्या असलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर गुंगीची पावडर फुंकून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने महिलेचे २९ हजार रुपये लाबंवले आहेत. याप्रकरणी अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोलते प्रकरणाचा तपास करत आहेत.
सालीयाबानो शहा यांनी पंजाब नॅशनल बँकेतून २९ हजार रुपये काढले होते. पैसे घेऊन घरी जाण्यासाठी त्या कल्याण नाका ते धामणकर नाका हद्दीतील गोल्डन हॉस्पिटलजवळ उभ्या होत्या. तेव्हा दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याजवळ येऊन गुंगीची पावडर फुंकली. यामुळे शहा यांना चक्कर आली. ही वेळ साधून चोरांनी त्यांच्याकडील पैसे घेऊन त्याजागी हातात नोटांच्या आकाराचे कागद ठेवले. शहा शुद्धीवर आल्यानंतर त्यांना पैसे चोरल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांनी शहर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली.