आरोप-प्रत्यारोपांनी काँग्रेसमधील अंतर्गत वाद विकोपाला #chandrapur #chandrapurloksabha


बाळू धानोरकरांच्या निधनावरून काँग्रेस गोटात सुरू झाले घमासान
चंद्रपूर:- लोकसभेत काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रश्नांची बाजू मांडणारे खासदार बाळू धानोरकर यांचे 30 मे 2023 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. मात्र पक्षातंर्गत विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे, असा गंभीर आरोप दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी दोन दिवसांपूर्वीच केला.

त्यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशातच आमदार धानोरकर यांच्यासारख्या जबाबदार लोकप्रतिनिधींनी असे बेछुट वक्तव्य करणे म्हणजे पक्षाची प्रतिमा मलिन करण्यासारखे असल्याचे स्थानिक नेत्यांनी म्हटले आहे.

स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाला लोकसभेची उमेदवारी मागण्याचा हक्क आहे. परंतु काँग्रेसच्या उमेदवारीवर केवळ माझाच हक्क आहे असे कुणी म्हणणे योग्य नाही. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेल्या धानोरकर यांना काँग्रेसच्या निष्ठावंतांना हे सांगायची गरज नाही. दिवंगत बाळू धानोरकर यांचा मृत्यू कशामुळे झाला हे सर्वश्रृत आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या बेछूट आरोपांनी काँग्रेस कार्यकर्ता दु:खावला आहे. त्यामुळे काँग्रेसने सर्वसमावेशक उमेदवार दिला तरच लोकसभा जिंकता येईल, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिकीट आपल्यालाच मिळावे, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात शितयुद्ध सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. विजय वडेट्टीवार यांनी त्यांची मुलगी तथा प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हिच्या उमेदवारीसाठी शिष्टमंडळ दिल्लीला पाठविले होते. त्यानंतर काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद अधिक प्रकर्षाने समोर आला आणि प्रतिभा धानोरकर यांनी काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोप करत निशाणा साधला होता.

प्रतिभा धानोरकर यांचे गंभीर आरोप

दरम्यान, प्रतिभा धानोरकर दोन दिवसांपूर्वीच म्हणाल्या होत्या की, काँग्रेस पक्षातले काही लोक सातत्याने माझा विरोध करत आहेत आणि याच विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे. कारण आमच्या पक्षात भाजपाच्या पेरोलवर चालणारे काही लोक आहेत. भाजपवाले जी ऑर्डर देतात ती ते फॉलो करतात. प्रतिभा धानोरकर यांचा रोख कोणाकडे होता, हे स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र त्यावेळी त्यांनी असेही स्पष्ट केले की, चंद्रपूर लोकसभेवर कोणीही दावेदारी केली तरी पहिला हक्क माझा आहे. मी नुकतीच काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेऊन आपली इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी माझे सगळं ऐकून घेतले असून ते या संदर्भात सकारात्मक असल्याचेही म्हटले होते.


व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

व्हिडिओ क्रमांक १.

यामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर यांचे दोन व्हिडिओ जोडण्यात आले आहेत. पहिल्या व्हिडिओत आमदार प्रतिभा धानोरकर म्हणताहेत, आमच्या पक्षात अनेक लोक आहेत की जे खासदारसाहेब गेल्यापासून सतत माझ्झा विरोध करत आहेत. या विरोधामुळे माझ्या नवऱ्याचा जीव त्यांनी घेतला, माझ्याही मागे ते लागून आहे पण एक जीव गेला आता दुसरा जीव जाणार नाही याची काळजी मी घेईन.'

व्हिडिओ क्रमांक २.

■ २५ तारखेपासून त्यांची तब्येत बिघडली नंतर सुरुवातीला नागपूरला राहि- ल्यानंतर डॉक्टरांनी ऑक्सिजन लेव्हल कमी होत आहे, तर तुम्ही तुरंत त्यांना हैदराबाद वा अन्य ठिकाणी हलवा, असा सल्ला दिला नतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने दिल्लीला हलविले. डॉक्टरानी पुरेपूर प्रयत्न केले पण, शरीराने प्रतिसाद दिला नाही. ब्लैडरमध्ये स्टोन होते त्यांचे इन्फेक्शन वाढले होते. शुगर कमी झाली होते. बीपीही कमी झाला. ऑक्सिजन लेव्हल फक्त ४० पर्यंत आले आणि डॉक्टरांचा नाईलाज झाला. त्यामुळे त्याना आपला प्राण गमवावा लागला.


मी झाल्या वक्तव्यावर ठाम:- प्रतिभा धानोरकर

माझ्या नवऱ्याच्या मृत्यूला नऊ महिने होत आहे. आताही असे वक्तव्य केले नसते, परंतु समोरच्यांनी जी खालची पातळी ओलांडली यामुळे हे वक्तव्य नाईलाजास्तव करावे लागले. ज्यांनी माझ्या वक्तव्यावर आरोप केले. ते लोक कोणाचे आहे. कोणाच्या सांगण्यावरून पुढे आले आहे. याचा शोध घ्यावा. मी नवरा गमावला आहे. त्यांनी काय गमावले? माझ्या पतीला आजार होते याची सर्वांना कल्पना होती. तरीही मृत्यूच्या काही काळापूर्वी त्यांच्यावर जे आरोप केले, त्यामुळे ते कमालीचे व्यथित व अस्वस्थ झाले. परिणामी त्याची प्रकृती बिघडली आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. मग मी कोणाला जबाबदार धरू?

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने