इचलकरंजी:- येथील काजवे हॉस्पिटल परिसरात फुगा फुगवून खेळताना तो फुटून श्वासनलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. गौरांश अमित लगारे असे त्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अमित लगारे यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा आहे. ते कुटुंबीयांसह काजवे हॉस्पिटल परिसरात भाड्याने राहतात. मंगळवारी सकाळी अमित यांचा मुलगा गौरांश हा मित्रांसोबत फुगे घेऊन खेळत होता. फुगा फुगविताना तो फुटला आणि गौरांशच्या श्वासनलिकेमध्ये जाऊन अडकला. त्यामुळे तो जागेवरच बेशुद्ध पडला. त्याला नातेवाइकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात नेले.
प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे त्याला आयजीएम रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, तेथे उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या पश्चात आई - वडील व बहीण असा परिवार आहे. यावेळी रुग्णालय परिसरात नातेवाइक आणि भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.