नागपूर:- चंद्रपूरहून नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आलेल्या व्यक्तीने दारू न दिल्याने परिसरातीलच एका आरोपीने थेट चाकूने वार करत जीवच घेण्याचा प्रयत्न केला. ईमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. विजय चंदन उज्जैनवार (४२, चंद्रपूर) असे जखमीचे नाव आहे. ते त्यांच्या ईमामवाडा निवासी नातेवाईकांकडे पाहुणचारासाठी आले होते.
शुक्रवारी दुपारी त्यांना रजत उर्फ मोनू रामटेके (३०, कुंदनलाल वाचनालयाच्या बाजुला) याने दारु मागितली. विजय यांनी त्याला नकार दिला. यावरून रजत संतापला व त्याने वाद घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करत त्याने विजय यांना मारहाण केली व अचानक चाकू काढत त्यांचा गळा व कानावर वार केले. यानंतर आरोपी फरार झाला. विजय यांना रक्तबंबाळ अवस्थेत मेडिकल इस्पितळात नेण्यात आले. कविता काडगे यांच्या तक्रारीवरून आरोपी रजतविरोधात गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.