चंद्रपूरात पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा #chandrapur #police #Chandrapurpolice #Foodpoison

चंद्रपूर:- पोलीस कर्मचाऱ्यांना जेवणातून विषबाधा झाली. यानंतर आठ जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या निर्देशानुसार जेवणाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. विषबाधा कशातून झाली, हे अहवालानंतरच स्पष्ट होईल. रविवारी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गृह विभागाने काही महिन्यांपूर्वी पोलीस भरती घेतली. या भरतीत पात्र ठरलेले सुमारे 200 पोलीस कर्मचारी चंद्रपुरात प्रशिक्षणासाठी आले आहेत. हे सर्व कर्मचारी पोलीस मुख्यालयात राहत असून याच परिसरातील 'कॅन्टिन'मध्ये सकाळ आणि रात्रीचे जेवण करतात. रविवारी सुमारे 41 प्रशिक्षणार्थ्यांनी येथे जेवण केले. यानंतर काही प्रशिक्षणार्थ्यांना त्रास जाणवू लागला. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील आठ कर्मचाऱ्यांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित सर्व कर्मचाऱ्यांना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

पोलीस अधीक्षकांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून जेवणाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याचे निर्देश दिले. चंद्रपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. 'डी-हायड्रेशन'मुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, विषबाधेचे मुख्य कारण प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच समोर येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या