Top News

दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या भेटीनंतर शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या.... #Chandrapurpolice #Chandrapurloksabha

चंद्रपूर:- लोकसभा जिंकायची असेल तर पक्षाने ओबीसी, बहुजन किंवा कुणबी समाजाचा, तसेच चंद्रपूर लोकसभा मतदार संघातीलच उमेदवार द्यावा, बाहेरचा उमेदवार लादू नये अशी साद आमदारांनी पक्षश्रेष्ठींकडे घातली आहे. दरम्यान, या बैठकीला राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना या बैठकीसाठी आमंत्रित न केल्याने वडेट्टीवारांची कन्या आणि महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी त्यांच्या समर्थकांसह थेट दिल्ली गाठली. शिवानी वडेट्टीवार या चंद्रपूर लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत.




२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रातील ४८ पैकी एकच जागा जिंकता आली होती. काँग्रेसचे सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे चंद्रपूरमधून निवडून आले होते. धानोरकर यांचं गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर आता या जागेसाठी त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर अग्रही आहेत. तसेच प्रदेश काँग्रेसने वडेट्टीवार यांच्यासह आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर अशी तीन नावे दिल्लीला पाठवली आहेत. अशातच शिवानी वडेट्टीवार यांनी आज दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीनंतर शिवानी वडेट्टीवार यांनी सांगितलं की, त्या लोकसभेसाठी इच्छूक आहेत. परंतु, त्यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते घेतील.

काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, मी पक्षश्रेष्ठींपुढे माझी इच्छा व्यक्त केली आहे. एक युवती म्हणून, काँग्रेसची कार्यकर्ती म्हणून मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी निर्णय हा पक्षाचा असेल. यावर पक्षातील वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात त्याची आम्ही वाट पाहतोय.

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व भाजपा नेते आणि एनडीएतील इतर पक्ष काँग्रेसवर आणि काँग्रेसचे मित्रपक्ष असलेल्या इंडिया आघाडीतल्या पक्षांवर घराणेशाहीवरून टीका करत आहेत. अशातच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्येने थेट लोकसभेचं तिकीट मागितल्याने विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसवर टीका सुरू झाली आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी यावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, मी केवळ विजय वडेट्टीवर यांची मुलगी म्हणून नव्हे तर एक काँग्रेस कार्यकर्ती म्हणून तिकीट मागितलं आहे. मी गेल्या ७ ते ८ वर्षांपासून काँग्रेससाठी काम केलं आहे आणि अजूनही करणार आहे. मी युथ काँग्रेसमध्येदेखील काम करत आहे. अलीकडेच काँग्रेसचं जयपूर येथे आंतरराष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. तिथे पक्षाने आम्हाला सांगितलं आहे की, जो कार्यकर्ता पाच वर्षांहून अधिक काळ पक्षासाठी काम करतोय त्याच्याकडे घराणेशाहीतला उमेदवार म्हणून पाहिलं जाणार नाही. त्याला पक्षाकडून संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळेच मी पक्षाकडे लोकसभेच्या तिकीटाची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने