Top News

"भाजपमध्ये कोण जाणार, एकदाचा सोक्षमोक्ष लावा" #chandrapur


काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांची प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

चंद्रपूर:- विधानसभेचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणतात, आमदार प्रतिभा धानोरकर भाजपमध्ये जाणार, तर आमदार धानोरकर सांगतात, वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार. प्रदेश काँग्रेसच्या बैठकीला दोन्ही नेते हजर आहेत. त्यामुळे कोण कुठे जाणार, हे दोघांनाही विचारून घ्या व एकदाचा सोक्षमोक्ष लावून टाका. उगाच संभ्रम निर्माण करू नका, अशी मागणी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष तथा राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक मुंबईत झाली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार धोटे, विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरीचे आमदार वडेट्टीवार, वरोरा-भद्रावतीच्या आमदार धानोरकर उपस्थित होत्या. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघातून आमदार धानोरकर, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार व त्यांची द्वितीय कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आमदार धोटे स्वत:देखील इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून धानोरकर व वडेट्टीवार गटाकडून एकमेकांबाबत भाजप प्रवेशावरून संभ्रम निर्माण केला जात आहे.

पक्षाचेच वरिष्ठ नेते, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एकमेकांबद्दल संभ्रम निर्माण करीत असेल तर संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होते. हा अपप्रचार पक्षाला हानीकारक ठरू शकतो. यामुळे आजच्या बैठकीला वडेट्टीवार व धानोरकर दोघेही उपस्थित आहेत. प्रदेशाध्यक्षांनी दोघांनाही एकदा स्पष्टपणे विचारावे की, कोण भाजपध्ये जाणार आहे. कुणीच कुठे जाणार नसेल तर अशाप्रकारे संभ्रम निर्माण करू नका. उगाच एकमेकांबद्दल अशा अफवा पसरवून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातील वातावरण गढूळ करू नका. पक्षश्रेष्ठींकडे लोकसभेची उमेदवारी मागण्याचा हक्क सर्वांनाच आहे. पक्ष ज्याला तिकीट देईल त्याच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहून निवडून आणू, अशी ठाम भूमिका धोटे यांनी मांडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने