सहा महिण्यातच भाजपाने कॉंग्रेसचा घेतला असा 'बदला' #chandrapur #chandrapurloksabha

2019 च्या लोकसभा निवडणूकीत चंद्रपूर निर्वाचन क्षेत्रातून कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी भाजपाचे हेवीवेट उमेदवार हंसराज अहीर यांचा 44,822 मतानी अनपेक्षित पराभव केला. राज्यात मोदी लाटेमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीची दाणादाण उडाली होती. राज्यात कॉंग्रेसला चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली. त्यावेळी केंद्रिय गृहराज्यमंत्री असलेल्या हंसराज अहीर यांना या निवडणूकीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र कॉंग्रेसला मिळालेले लोकसभेतील यश सहा महिण्यात आलेल्या विधानसभेत टिकविता आले नाही. चंद्रपूर लोकसभेतील सहा विधानसभेच्या निवडणूकीत तब्बल 6 टक्के अधिक मते घेवून भाजप- शिवसेनेने 'बदला' घेतला होता.


चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात राजूरा, चंद्रपूर, बल्हारपूर, वरोरा, वणी, आर्णी असे सहा विधानसभेचे मतदार संघ येतात. यापैकी तीन भाजपाकडे, दोन कॉंग्रेस तर एक अपक्ष असे निवडूण आले होते. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे भाजपाच्या विरोधात निवडूण आले होते, त्यांना चंद्रपूर क्षेत्रातील भाजपात्तर पक्षासह भाजपातीलही अनेकांचा उघड पाठींबा होता. आमदार किशोर जोरगेवार हे या निवडणूकीत भाजपाच्या बाजूने आहेत, सद्यस्थितीत भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांचेबाजूने त्यांचेसह चार आमदार तर, कॉंग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचेबाजूने त्यांचेसह दोन आमदार प्रचारात आहेत.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत राजुरा मतदार संघातून बाळू धानोरकर यांना 1,09,132 मते मिळाली होती तर, भाजपाचे हंसराज अहीर यांना 73,880 मते मिळाली होती. या मतदार संघात बाळू धानोरकर यांना 35,252 मताची आघाडी मिळाली होती. हे त्यांना सहाही मतदार संघापैकी सर्वाधिक मताधिक्य होते. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेसचे सुभाष धोटे यांना 60,228 मते तर भाजपाचे संजय धोटे यांना 51,051 मते मिळाली होती. विधानसभेच्या निवडणूकीत वामनराव चटप यांचे उमेदवारीचा फटका भाजपा व कॉंग्रेसला बसला होता. कॉंग्रेसला तब्बल 60,228 मते कमी मिळाली होती तर भाजपाचे उमेदवारास 22,829 मते कमी मिळाली होती.

चंद्रपूर मतदार संघातून बाळू धानोरकर यांना 1,03,931 मते मिळाली होती तर अहीर यांना 78,187 मते मिळाली होती. 25,744 मताची बाळू धानोरकर यांना आघाडी मिळाली होती. विधानसभेच्या निवडणूकीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना 117,570 मते मिळाली होती. या निवडणूकीत कॉंग्रेसच्या उमेदवारास केवळ 14,284 मते तर भाजपाचे उमेदवारास 44,909 मते मिळाली होती. लोकसभेपेक्षा विधानसभेत भाजपाला 33278 मते कमी मिळाली. कॉंग्रेस भाजपाचे मते या निवडणूकीत किशोर जोरगेवार यांना मिळाली ते आता भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रचारात गुंतले आहेत.

बल्हारपूर निर्वाचन क्षेत्र हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. मागील पस्तीस वर्षापासून या मतदार संघात भाजपाचेच आमदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूकीत बल्हारपूर मतदार संघातून बाळू धानोरकर यांना 96,541 मते मिळाली होती तर भाजपाचे अहीर यांना 65,480 मते मिळाली. या निवडणूकीत 31,061 मताची अनपेक्षीत आघाडी धानोरकर यांना मिळाल्यांने राजकीय वर्तुळात शंका—कुशंका व्यक्त केल्या गेली. विधानसभेच्या निवडणूकीत सहा महिण्यातच भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाचे मताधिक्य वाढवित 86,002 मते घेतली, तर कॉंग्रेसची मते तब्बल 43,779 ने कमी झाले. या निवडणूकीत कॉंग्रेसचे डॉ. झाडे यांना 52,762 मते मिळाली.

वरोरा मतदार संघात लोकसभा निवडणूकीत बाळू धानोरकर यांना 88,627 मते मिळाली तर हंसराज अहीर यांना 76,167 मते मिळाली. वरोरा हा बाळू धानोरकर यांचा स्वत:चा मतदार संघ होता, मात्र जिल्हयात सर्वाधिक कमी मते त्यांना याच क्षेत्रात मिळाली. या मतदार संघात त्यांचे मताधिक्य 12,460 चे होते. विधानसभेच्या निवडणूकीत मात्र हा मतदार संघ शिवसेनेकडे गेला. यावेळी बाळू धानोरकर यांनी आपल्या पत्नीला अर्थातच विद्यमान लोकसभा उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना रिंगणात उतरविले. या निवडणूकीत कॉंग्रेसचे मताधिक्य कमी होवून, श्रीमती धानोरकर यांना 63,862 मते मिळाली. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेत 24,765 मते कॉंग्रेसला कमी मिळाले तर, या भाजपा ऐवजी शिवसेनेने ही सीट लढविली होती. त्यांना 53,665 मते मिळाली होती. या मतदार संघातून मनसेकडून राजूरकर यांनी निवडणूक लढवित 34,848 मते घेतली. राजूरकर आता भाजपाचे वरोरा विधानसभा प्रमुख असून ते सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार करीत आहे.

यवतमाळ जिल्हयातील वणी या मतदार संघात बाळू धानोरकर यांना 90,367 मते मिळाली होती तर हंसराज अहीर यांना 92,366 मते मिळाली होती. या मतदार संघात 2004 ची अल्प आघाडी अहीर यांना मिळाली होती. वणी हे बाळू धानोरकर यांची सासुरवाडी आणि व्यावसायीक ठिकाण असल्यांने येथे बाळू धानोरकर यांना मोठी आघाडी मिळेल असे त्यावेळी सर्वांनाच वाटले होते, मात्र प्रत्यक्षात अहीर हे धानोरकर यांचेपुढे राहीले. विधानसभेच्या निवडणूकीत कॉंग्रेस उमेदवारांस 39,915 मते तर भाजपाचे उमेदवारास 67,770 मते मिळाली. या निवडणूकीत 27,855 मतानी कॉंग्रेसची घसरण झाली.

आर्णी या मतदार संघात बाळू धानोरकर यांना सर्वात कमी म्हणजे, 68,952 मते मिळाली तर हंसराज अहीर यांना 1,26,648 मते मिळाली. या मतदार संघात तब्बल 57,696 मताची अहीर यांना आघाडी मिळाली होती. विधानसभेत कॉंग्रेसचे मते वाढून 78,446 मते मिळाली तर भाजपाची मताधिक्य कमी होत 81,599 इतके झाले. या मतदार संघात भाजपाचे संदीप धुर्वे आमदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील, चंद्रपूर जिल्हयातील चारही मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना आघाडी मिळाली होती तर, यवतमाळ जिल्हयातील दोनही मतदार संघात भाजपाचे हंसराज अहीर यांना आघाडी मिळाली होती.
लोकसभेत कॉंग्रेसला 45.6 टक्के मतदान मिळाले तर भाजपाला 41.9 टक्के मतदान मिळाले होते. यानंतर झालेल्या सहा महिण्यांनंतरच्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला 25.1 टक्के तर, भाजपाला (शिवसेनासह) 31.1 टक्के मते मिळाली. (वरोरा मतदार संघात भाजपा ऐवजी शिवसेनेचा उमेदवारांनी निवडणूक लढविली.) तब्बल 6 टक्के मताधिक्य मिळवित, लोकसभेच्या निवडणूकीतील पराभवाचा वचपा भाजपानी विधानसभेच्या निवडणूकीत काढला होता.

विजय सिध्दावार
9422910167

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या