चंद्रपूर:- विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने विदर्भातील संपूर्ण 11 जिल्ह्यांत 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचा निषेध करत तीव्र आंदोलन करणार आहे. उद्या बुधवार 1 मे हा निषेध दिन (काळा दिवस) म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
विदर्भवादी विदर्भातील अकराही जिल्ह्यात जिल्हास्थळी काळ्या पट्ट्या / काळा गणवेश / काळी टोपी व काळा स्कार्प किंवा दुपट्टा लावून जिल्हा मुख्यालयाच्या शहरातील केंद्र स्थळी महापुरूषांच्या पुतळ्यांसमोर महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहेत.
या आंदोलनात अँड. वामनराव चटप, डॉ. श्रीनिवास खांदेवाले, अरुणभाऊ केदार, मुकेश मासुरकर, डॉ. रमेश गजबे आदींच्या नेतृत्वात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जाणार आहे.
वीजदर निम्मे करा, घरगुती वीज 200 युनिटपर्यंत मोफत द्या, कृषीपंपाचे वीजबिल माफ करा, विजेवरील स्थिर आकार, वीज वहन कर, इन्फ्रास्ट्रक्चर करासह विविध कर व आकार रद्द करा, भारनियमन बंद करा, आदी मागण्यांसाठी समितीच्यावतीने सातत्याने आंदोलन करण्यात येत आहे.
छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, तेलंगणसारख्या राज्यांनी अल्पावधीत चांगला विकास केला. वेगळ्या विदर्भासाठी भाजपने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचा परिणाम म्हणजे त्यांचे विदर्भातून आमदार कमी झाले. यापासून धडा घेत भाजप नेत्यांनी जनतेच्या भावना समजून घ्याव्यात.
राज्यावर ६ लाख ७१ हजार कोटी रुपये कर्जाचा डोंगर आहे. आतापर्यंत विदर्भाचे शोषण केले आणि आताही तेच सुरू आहे. ब्रम्हदेव आला तरी विदर्भाचा विकास होणार नाही, असे वामनराव चटप यांनी सांगितले.
आंदोलने यापुढेही सुरूच राहातील, असे चटप यांनी सांगितले. पोलिसांनी दडपशाहीने आंदाेलन मोडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही दडपशाहीला जुमानणार नाही, असे चटप म्हणाले.