डीजे बंद केल्याचा राग ठेवून तरुणावर कोयत्याने हल्ला #chandrapur #mul #pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- प्रचंड आवाजाने डीजेवर बेधुंद नाचताना विद्यार्थ्यांना त्रास होतो म्हणून हटकल्याने एका युवकाने पाठलाग करून विवाहित इसमावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना जूनगाव येथे रविवारी (दि. २९) रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. साईनाथ पाल (४०) असे जखमीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी हिमालय गेडाम (३२) याला सोमवारी अटक केली असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. जखमीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

जुनगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त डीजे वाजविण्यात आला होता. त्यावेळी आरोपी हिमालय गेडाम व त्याचा भाऊ नाचत होता. वॉर्डातील विद्यार्थी अभ्यास करीत असल्याने आवाज कमी ठेवा किंवा दूर वाजवा, अशी विनंती साईनाथ पाल यांनी केली असता आरोपीने वाद घातला. दरम्यान, काही वेळाने डीजे बंद करण्यात आला. पण, याचा राग मनात ठेवून आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती.

रविवारी तो दुपारीच कोयता घेऊन पाल यांच्या घरी गेला होता. मात्र, ते विवाह सोहळ्यासाठी बाहेरगावी गेल्याचे समजले. सायंकाळी आल्यावर आरोपीने साईनाथ पाल यांचा पाठलाग करत कोयत्याने वार केला.