व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असल्याने जो-तो स्वतंत्र वाटेने जातो. निवडणूक काळातही प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. मग ते मित्र असले तरी विरुद्ध विचारसरणीमुळे वेगवेगळ्या विचारांना पाठिंबा देतात. निवडणुकीच्या धामधुमीत विचारांनी दुरावलेल्या मित्रांना एकजूट करणारा एक संदेश सध्या सोशल मीडियावर प्रसारित केला जात आहे. 'झाले इलेक्शन, जपा रिलेशन' शीर्षकाखाली असलेले हे डिजिटल पोस्टर समाजात मैत्रीच्या रूपाने जुळलेली नाळ पुन्हा घट्ट करण्याचा संदेश देत आहे.
मतभिन्नतेमुळे दुरावलेली नाती, मैत्री पुन्हा जवळ यावी, त्यात आपुलकीची किनार असावी, यासाठी ह्या डिजिटल पोस्टरद्वारे सामाजिक संदेश देत आवाहनसुद्धा केले जात आहे. 'निवडणूक संपली आता मैत्रीच्या पक्षात या, कारण गेल्या एका महिन्यापासून मित्रांची मित्रांसोबत बंडखोरी झाली होती. आता मित्रांशी आघाडी- युती करा, हेच आपले मैत्रीचे राजकारण होय.' असा सामाजिक व तितकाच प्रबोधनात्मक संदेश डिजिटल पोस्टरद्वारे व्हॉट्सअँप व फेसबुकसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात आहे.
Also Read:- चंद्रपुरात वाढतोय उष्माघाताचा धोका