गोंदिया:- मुख्याध्यापक-शिक्षक यांच्यात सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करणार्या सेवानिवृत्त लिपिकाला जीव गमवावा लागल्याची घटना देवरी तालुक्यात आज 16 मे रोजी उघडकीस आली.
मुकूंद बागडे (60) रा. मुल्ला ता. देवरी असे मृतकाचे नाव आहे. देवरी तालुक्यातील डवकी येथील सिद्धार्थ विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे बुधवार 15 मे रोजी शाळा प्रशासनाने सभा आयोजित केली होती. सभेत विविध विषयांवर चर्चा झाली. सभा संपताच शिक्षक हिरालाल खोब्रागडे (52) यांनी त्यांच्या वयक्तिक समस्या उपस्थित करून संस्थापक तथा मुख्याध्यापक महेंद्र मेश्राम यांना धारेवर धरले. यावरून त्यांच्यात वाद झाला.
वाद विकोपाला गेला. माझ्या आयुष्याची वाट टतुमच्यामुळे लागली, असा आरोप खोब्रागडे यांनी मुख्याध्यापकांवर करीत हल्ला चढविला. दरम्यान वाद वाढत असल्याचे पाहून मृतक मुकूंद बागडे यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण दोघेही समजण्याचा प्रयत्नात नव्हते. दरम्यान खोब्रागडे यांनी बागडे यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. यात बागडे जखमी झाल्याने जागीच बेशुध्द होवून पडले. बेशुध्दावस्थेत त्यांना देवरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना 16 मे रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी देवरी पोलिसानी घटनेची नोंद करून आरोपीला अटक केली आहे.