शेतकरी लागला कामाला, पाळेधुऱ्यांची साफसफाई सुरू #chandrapur #sindewahi

Bhairav Diwase
खरीप पेरणीपूर्व मशागतीला आलाय वेग

सिंदेवाही:- मे महिन्यातील वीस दिवस पूर्ण होताच तालुक्यातील शेतक-यांनी खरिपातील पेरणीपूर्व मशागतीला सुरुवात केली आहे. दरम्यान, शेतशिवारात धूर सध्या निघू लागला असून, हा धूर खरीप हंगाम सुरू होण्याचे संकेत देऊ लागला आहे. शेतांमध्ये शेणखत पसरवण्याचीही लगबग सुरू झाली असून, सध्या शेतकरी कामाला लागला आहे.

शेतकरी शेतात खरीप व रब्बी पीक घेतात. ही दोन्ही पिके निघाल्यावर शेतात केरकचरा असतो. तसेच धान पिकातील धसकटे असतात. त्यामुळे नांगरणी, रोवणीची कामे करताना अडचणी येतात. पाऱ्याधुऱ्यांवर लावलेल्या तूर पिकांची खूंटे असतात. खरिपातील पीक लागवडीसाठी ही धसकटे आड येऊ नये म्हणून शेतकरी ही खुटे उपटून पाळे साफ करीत असतात. ज्या ठिकाणी धान पन्हे टाकल्या जातात त्या भात खाचरांची चांगली साफसफाई करावी लागते. त्यामुळे तणस टाकून ती जाळली जातात. या कामासाठी शेतकरी सकाळी व सायंकाळी शेतात जाऊन कचरा नष्ट करतात. त्यामुळे शेतशिवारात सर्वत्र धूर निधताना दिसून येत आहे.तणस शेतातच जाळली जात आहे.

शेतकरी व महिला सकाळी ६ वाजेपासून जाताना दिसून येतात शेतातील कचरा, पहे टाकण्याच्या जागेवर कचरा जाळून साफसफाईची लगबग सुरू आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असून, शेतकरी कुटुंबातील सर्वच सदस्य पाळेधुरे साफसफाईच्या व काडीकचरा जाळण्याच्या कामात व्यस्त आहेत.

गुरांची संख्या रोडावली आहे. दिवसेंदिवस पाळीव जनावरांची संख्या कमी झाल्याने शेतकरी जनावरांसाठी आवश्यक प्रमाणात तणस घरी घेऊन जातात. उर्वरित तणस जाळून टाकतात. यामुळे आता दिवसेंदिवस तणसाचे महत्त्व कमी होत असल्याचे दिसून येत आहे. सध्या शेतकरी शेतातील नांगरणी व वखरणीचे काम करताना दिसून येत आहेत.