सिंदेवाही:- तालुक्यामध्ये अतिक्रमावर जेसीबी चालताना पाहायला मिळाला. बऱ्याच वर्षांपासून काहींनी वर्दळीच्या मार्गावर केलेले अतिक्रमण प्रशासनाने मंगळवारपासून जेसीबीच्या साहाय्याने हटविणे सुरू केल्याने नागरिकांनी मोकळा श्वास घेतला. परंतु जे छोटे पान टपरी, नाश्त्याचे दुकान घेऊन बसले होते त्यांना उपासमारीची वेळ नक्कीच आली असे मत छोटे दुकानदारांनी व्यक्त केले आहे. दरम्यान या मोहिमेमुळे अतिक्रमण धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. छोटे व्यावसायिक आता आम्ही रस्त्यावर येऊ अशी एकमेकात चर्चा करताना दिसून येत आहेत.
शहरातील अतिक्रमणधारकांवर कारवाई होईल, अशी काही दिवसांपासून चर्चा सुरू होती, शहरातील चारी बाजूंच्या रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. त्यासाठी अतिक्रमणावर कारवाई होणे आवश्यक होते; पण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे अतिक्रमण काढण्यास विलंब सुरू होता. त्यामुळे चारपदरी मार्ग करण्यासाठी कंत्राटदाराला मोठ्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत होता. यासाठी प्रशासनाने बैठकांवर बैठका घेऊन कारवाई करण्याबाबत एकमत झाले.
अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आली. ज्यांचे पक्के बांधकाम आहेत त्यांनी ते काढावे, अशा सूचना दिल्या होत्या. मात्र अतिक्रमणधारकांनी स्वतःहून तहसीलदारांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक झाली. सात दिवसांअगोदर अतिक्रमण न हटविल्याने मंगळवारपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली.
पोलीसांचा चोख बंदोबस्तमध्ये अतिक्रमणला सुरुवात
पंचायत समितीपासून ते जुने बसस्थानक यावर पक्के बांधकाम तसेच टिनाचे शेड टाकले होते, ते आज काढण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राठोड, वानखेडे, सिंचन विभागाचे अधिकारी, महावितरण विभागाचे सहारे, नगरपंचायतीचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
अतिक्रमण हटविताना कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. घटनास्थळावर पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.