Suicide News: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Bhairav Diwase
जळगाव:- आजकाल तरुणांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. एखाद्या गोष्टीत अपयश आले तर तरुण पिढी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते. अशीच एक घटना जळगावमधून समोर आली आहे. यामध्ये जळगावमधील चहार्डी येथील रहिवासी व स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय २७) या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली. मालेगाव येथे टंकलेखनाची परीक्षा देण्यासाठी गेला असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील कुलदीप पाटील हा १९ जूनला मालेगाव येथे टायपिंग परीक्षा देण्यासाठी गेला होता. पेपर दिल्यानंतर त्यांचा परिवाराशी संपर्क होऊ शकला नाही. मोबाईल बंद असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा तपास न लागल्याने २० जूनला मालेगाव छावणी पोलिस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर २२ जूनला नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत गळफास घेतलेल्या अवस्थेत कुलदीपचा मृतदेह त्या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला. यानंतर कुलदीपचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास लावून आपले जीवन संपविल्याने चहार्डी गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे. कुलदीपने बारामती येथून एम. एसस्सी.(कृषी)चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तो महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा देत होता.

त्यात त्याला यश देखील मिळत होते. त्यात तो राज्यसेवेची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेची तयारी करीत होता. १९ जूनला तो मालेगाव येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या टंकलेखनाची (टायपिंग) परीक्षा देण्यासाठी गेला होता. मात्र अचानक त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. कुलदीपने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.