जल्लोष भोवला; दोघांविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा
नाशिक:- नुकत्याच पार पडलेल्या शहर-जिल्हयातील पोलीस भरतीच्या मैदानी व लेखी चाचण्यांपूर्वी यश मिळविलेल्या शहरातील काही पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणाऱ्या अकॅडमीतील युवकांनी शहराच्या मध्यवर्ती भागात जल्लोष केल्याचे प्रकरण त्या अकॅडमीच्या संचालकांच्या अंगाशी आले आहे.
अशा दोघा संचालकांविरोधात सरकारवाडा पोलिसात जमावबंदी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शहर-जिल्ह्यात असलेल्या अशा अकॅडमींचे धाबे दणाणले आहे.
गेल्या महिन्याभरापासून शहर आयुक्तालय आणि ग्रामीण पोलीस दलामध्ये रिक्त पोलीस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी व लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. यामध्ये गेल्या आठवड्यात कटऑफनुसार यादीही जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र अद्यापही या यादीतील युवकांची वैद्यकीय चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी झालेली नाही. सदरची प्रक्रिया येत्या आठवड्यात सुरू होणार आहे.
दरम्यान, पोलीस दलात भरती होण्यासाठी शहरात मोठ्या संख्येने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देणार्या अकॅडमींचे पेव सुटलेले आहे. अशा अकॅडमीमध्ये शेकडो युवक-युवती पोलीस वा सैन्याच्या भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी येतात. अशा काही अकॅडमींचे शहराच्या मध्यवर्ती परिसरामध्ये प्रशिक्षण केंद्र आहेत.
पोलीस भरतीची कटऑफ यादी जाहीर झाल्यानंतर यात नाव आलेल्या युवकांनी आणि अकॅडमीच्या संचालकांनी गेल्या दोन दिवसांपासून भर रस्त्यावर गुलाल उधळून आणि ढोल वाजवून जल्लोष केला आहे. एम.जी. रोड, गोळे कॉलनी या परिसरात या युवकांनी केलेल्या जल्लोषाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात येऊन ते सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आले आहे.
त्याची गंभीर दखल पोलीस आयुक्तालयाने घेतली आहे. त्यानुसार, सरकारवाडा पोलिस ठाण्यात दोन ॲकडमीच्या संचालकांविरोधात जमावबंदी आणि मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, संबंधितांना समज देत चौकशीला बोलाविण्यात आलेले आहे.