वर्धा:- रेल्वेत फूड कॉन्ट्रक्टर असल्याची बतावणी करून अनामत म्हणून दोन कोरे धनादेश देऊन बायलर कोंबड्याची उचल करून व्यावसायिकाची तब्बल 9 लाख 74 हजार 274 रुपयांनी फसवणूक केली. ही घटना महादेवपुरा येथे उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आसिफ मो. हनीफ मुसानी (37) रा. महादेवपुरा यांचे नुरानी चिकन सेंटरचे दुकान आहे. चंद्रपूर येथील विष्णू प्रसाद नामक व्यक्तीने त्यांना फोन केला व रेल्वे फूड कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. तुम्ही बायलर कोंबडीचा माल पुरविणार का अशी विचारणा केली. यानंतर अनामत म्हणून त्याने दोन धनादेश त्यांच्या दुकानान पाठविले. दोन दिवसांनी विष्णू प्रसाद याने फोन करून मला रोज 3 टन मटण लागेल, 15 दिवसांचा हिशोब होईल तेवढी रक्कम धनादेशाद्वारे तुम्ही काढून घ्या, असे सांगितले.
त्यानुसार 9 लाख 74 हजार 259 रुपयांची 13 हजार 14 किलो बायलर कोंबड्या चंद्रपूर जिल्ह्यातील पडोली येथील पोल्ट्रीफॉर्मवर पाठवण्यातआल्या. यानंतर बँकेत धनादेश जमा केला असता वठला नाही. बँकेत विचारणा केली असता दोन वर्षांपूर्वीच हे अकाउंट बंद झाल्याचे सांगण्यात आले. चिकन सेंटरच्या मालकाने विष्णू प्रसादला फोन केला असता मी तुम्हाला ऑनलाइन पैसे पाठवितो असे सांगितले. परंतु, या नंतर त्याने फोन उचललने बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी वर्धा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला.