National Service Scheme: सरदार पटेल महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा #chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- केंद्रीय क्रीडा व खेल मंत्रालय यांच्या तर्फे 24 सप्टेंबर 1969 साली युवकांना सामजिक क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण व्हावी म्हणून शासनाने राष्ट्रीय सेवा योजनेची सुरुवात केली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापना दिनानिमित्त सर्वोदय शिक्षण मंडळ संचालित सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारा दि. 24 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे आयोजन करण्यात आला.

उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार यांनी प्रास्ताविक बोलताना म्हणाले की, ‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते.

यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर म्हणाले की, युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके, डॉ. राजकुमार बिरादार, डॉ. निखील देशमुख, स्वयंसेविका रुचिता तोकलवार, स्वयंसेवक दर्शन मेश्राम, भैरव दिवसे तसेच मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, सूत्रसंचालन डॉ. वंदना खनके, तर आभार डॉ. निखील देशमुख यांनी केले.