आत्ता कुठे खऱ्या अर्थाने राजकीय धुरळा उडायला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षातील ईच्छूक नेते उमेदवारी मिळवून घेण्याच्या प्रयत्नात लागल्याचे दिसत आहेत. काँग्रेस कडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत, तद्वतच काँग्रेस मध्ये प्रवेश केलेल्या पण आत्ताच्या काँग्रेस नेत्या डाॅक्टर अभिलाषा गावतुरे, बल्लारपूर नगरपालीकेचे माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार तर शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे इत्यादी नेते मंडळी उमेदवारी मिळवून घेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतांना दिसत आहेत. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी निश्चित झाली आहे. मात्र मागील आठवड्यात राष्ट्रवादी (शरद पवार) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बल्लारपूरच्या एका कार्यक्रमात बल्लारपूर विधानसभेवर दावेदारी करू असे वक्तव्य केल्याने महा विकास आघाडीतील कोणत्या घटक पक्षाला या क्षेत्राची उमेदवारी जाईल हे आत्ताच सांगणे अवघड आहे.
महाविकास आघाडीत ईच्छूकांची संख्या अधिक आहे. राज्यातील वजनदार मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभेतील पराभवानंतर किंबहुना बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील ४८ हजार २०० च्या फरकामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्याचे दिसत आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत, कॉंग्रेस नेत्या डाॅक्टर अभिलाषा गावतुरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे पायाला भिंगरी बांधून फिरतांना दिसत आहेत, तर प्रकाश पाटील मारकवार यांनी सुध्दा 'जन प्रकाश यात्रा ' च्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रातील नागरीकांसोबत संवाद साधत फिरत आहेत. या निवडणुकीत बल्लारपूर विधानसभेवर काँग्रेसचा झेंडा फडकणार असल्याचे प्रकाश पाटील मारकवारसह सर्वच नेते जाहीरपने सांगत आहेत. विद्यमान आमदार तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार सुध्दा यात मागे नाहीत. त्यांचेसुध्दा कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या दरबारात जाणे सुरू आहे. सुधीर मुनगंटीवार सध्या राज्यातील सत्तेत असल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे.
जुलै महिन्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले गोंदिया जिल्ह्य़ातील त्यांच्या स्वगावी आले असतांना संतोषसिह रावत यांच्या शेकडो समर्थकांनी पटोले यांची भेट घेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी उमेदवारीची मागणी केली होती. प्रदेशाध्यक्षानी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगत त्या दिवसापासूनच संतोषसिह रावत कामाला लागल्याचे दिसत आहेत. भूमीपूत्र ब्रिगेडच्या मार्गदर्शक डाॅक्टर अभिलाषा गावतुरे यांना सुध्दा उमेदवारीची अपेक्षा असल्याने त्यांच्याही गावोगावी भेटीगाठी सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्यांचीही विधानसभा क्षेत्रात चांगलीच ओळख निर्माण झाली आहे. शिवाय विधानसभा निवडणुकीत कदाचित जातीय समीकरण चालणार असल्याचे त्यांचे भाकीत असावे? ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे क्षेत्रातील जनसंपर्कात कुठेही मागे नाहीत. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्याला तयारी करण्यास सांगीतले असल्याचे सांगत अनेक छोट्यामोठ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते क्षेत्रातील गावोगावी भेटी देत कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत. बल्लारपूर विधानसभेत काँग्रेसचे उमेदवार तिनदा सुधीर मुनगंटीवार यांचेकडून पराभूत झाल्याने चौथ्यांदा कदाचित काँग्रेसला या क्षेत्राची उमेदवारी वाट्याला जाणार नाही या अपेक्षेवर संदिप गिऱ्हे पूर्ण ताकदीने कार्यरत असल्याचे दिसत आहे. मात्र मुरब्बी काँग्रेस इतक्या सहजासहजी आपला दावा सोडेल असे सध्याच्या वातावरणावरून तरी दिसत नाही.
भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सलग पंधरा वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रावर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व राहीले आहे. या पंधरा वर्षाच्या कालखंडात सुधीर मुनगंटीवार दोनदा मंत्री झाल्याने या विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याचा बर्यापैकी विकास झाल्याचा दावा भाजपा करीत असून या विकासाच्या मुद्यावरच भाजपा उमेदवार जनतेच्या दरबारात जाणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत चांगले परिचित असून यावेळेस त्यांची पकड अधिक घट्ट झाली असल्याची रावत यांचे समर्थक दावा करीत आहेत. संतोषसिह रावत यांची ओळख निश्चितच क्षेत्रातील लोकांना चांगल्यापैकी आहे. बल्लारपूरचे माजी नगराध्यक्ष घमश्ययाम मुलचंदानी त्यांच्यापरिने जनसंपर्कात आहेत. बल्लारपूर शहरावर त्यांची चांगली पकड असून, काॅंग्रेसचे ते बल्लारपूर तालुकाध्यक्ष राहील्याने ग्रामीण भागातही ते चांगलेच परिचित असल्याचे सांगीतले जाते. शिवाय एकदा त्यांना बल्लारपूर विधानसभेत उमेदवारी मिळाली असल्याने निश्चितच मुलचंदाणी सर्वाच्या परिचयाचे आहेत. उबाठा चे शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे जिल्हाप्रमुख म्हणून तर परिचयाचे होतेच, शिवाय विधानसभेची तयारी म्हणून त्यांनी सगळ्यात पहिले सुरूवात केल्याने आता ते विधानसभा क्षेत्रात सर्वांच्या परिचयाचे झाले आहेत. मात्र "मशाल " गावोगावी पोहचवतांना त्यांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. डाॅक्टर अभिलाषा गावतुरे वैद्यकीय क्षेत्रातील परिचित नांव असून मागील तिनचार वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात काम करीत असल्याने आणि लोकसभा निवडणुकीपासून राजकीय क्षेत्रात सुध्दा सक्रिय झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात हे नांव परिचयाचे झाले आहे.
भाजपाने सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडे अनेक चेहरे आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्या तोडीसतोड म्हणून महाविकास आघाडी कोणत्या पक्षाला उमेदवारी देऊन कोणता उमेदवार राजकीय आखाड्यात उतरवते यासाठी थोडे काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.