चंद्रपूर:- वन्यजीव सप्ताहास थाटात प्रारंभ झाल्यावर दुसऱ्या दिवशी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर झोनचे सहाही दरवाजे बुधवाररपासून खुले झाले आहेत.
ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. ताडोबाला १ जुलैला प्रकल्पाला पावसाळी सुट्टी लागल्यावर प्रकल्पाचा कोर झोनचे दरवाजे ३ महिने बंद होते. ती सुट्टी संपली असून आता ताडोबा कोरचे दरवाजे बुधवारपासून खुले झाले आहेत. मोहर्ली येथे विधिवत नारळ फोडून कोअरचे दरवाजे उघडले. यावेळी प्रकल्प व्यवस्थापनाच्या वतीने पर्यटकांना गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी मुख्य वन संरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, ताडोबा कोअरचे उपसंचालक आनंद रेड्डी, विभागीय वनाधिकारी सचिन शिंदे,वनपरिक्षेत्राधिकारी अरुण गोंड, इको टुरिझम बोर्डाचे सदस्य प्रकाश धारणे,अरुण तिखे , यांच्यासह मान्यवर व रिसोर्ट मालक उपस्थित होते. प्रकल्पात मोहुर्ली, पांगडी, झरी, कोलारा, नवेगाव व खुटवंडा अशा सहा प्रवेशव्दारातून पर्यटकांचे प्रवेश सुरु झाला. जैविक विविधता आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या तसेच घनदाट जंगलांनी व्याप्त असलेल्या ताडोबात यंदा मुबलक पाऊस झाल्याने सर्वत्र हिरवाई दृष्टीस पडत आहे.