चंद्रपूर:- देश, राज्य आणि जिल्ह्याच्या गतिमान विकासासाठी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकार अविरत काम करत आहे. देशाला आत्मनिर्भर आणि जगातील तिसरी महाशक्ती बनवायचे असेल आणि राज्याचा, चंद्रपूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर महायुतीला निवडून आणल्या शिवाय दुसरा पर्यायच नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले आहेत. मतपेढीचे आणि जातीजातीमध्ये विष कालवण्याचे हीन राजकारण करणा-यांना दूर लोटा आणि महायुतीला कौल द्या, असे आवाहन मंत्री गडकरी यांनी बुधवारी १३ नोव्हेंबर केले.
तब्बल 50 कोटी वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनात अत्यंत महत्त्वाचे योगदान देणारा राज्यातील पहिला श्रेष्ठ नेता सुधीर मुनगंटीवार असून, त्यांनी तब्बल 50 कोटी झाडे लावून वन विकसित केले आहे. विकासाच्या बाबतीतही महाराष्ट्रातील पहिल्या पाच नेत्यांमध्ये ते अग्रेसर आहेत. अशा गुणी नेत्याला आपण प्रचंड बहुमताने निवडूण द्यावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शक्तीनगर येथील जाहीर सभेत केले.
बल्लारपूर मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार, वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ दुर्गापूर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी मुनगंटीवार यांना निवडून देण्याचे आवाहन मंत्री गडकरी यांनी केले. लोक कल्याणाच्या सरकारी योजनांचे लाभ जातीधर्मा पलिकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार झटत आहे. मात्र विरोधकांना केवळ जातीपातीचे राजकारण करायचे आहे अशी टीका मंत्री गडकरी यांनी केली.
आज सर्वत्र पायाभूत सुविधा बळकटीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. शेतक-याला संपन्न करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत. बांबू पासून मिथेनॉल, बायो एव्हिएशन इंधन निर्मिती चंद्रपूर येथे होत असून, शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता आणि इंधनदाता बनला आहे. बल्लारपूर येथे मिथेनॉल सोबतच, अमोनियम नायट्रेट बनवणारा प्रकल्प होणार असल्याचेही ते म्हणाले.
पर्यटनाला प्रोत्साहन दिल्यामुळे आज ताडोबा व्याघ्र प्रकल्प जागतिक स्तरावर पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मंत्री मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार सरकारच्या प्रयत्नामुळे ताडोबा जंगलात आज वायु आणि ध्वनी प्रदुषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक गाड्या लवकरच धावणार आहेत असेही त्यांनी नमूद केले.