Be alert! सतर्क राहा! "या" नंबर्सवरून तुम्हाला कॉल आला का? सरकारकडून आला नवा हायअलर्ट

Bhairav Diwase

मुंबई:- सायबर क्राइम हे सध्याच्या काळातले असे गुन्हे आहेत, की सावधगिरी बाळगली नाही, तर त्यात कोणीही अडकू शकतं. सायबर क्राइमच्या गुन्ह्यांमध्ये जगभर वेगाने वाढ होत आहे. ऑनलाइन किंवा टेलिफोनिक व्यवहार करताना माणसं काय चूक करू शकतात, हे बरोबर हेरून गुन्हेगार त्यांना जाळ्यात अडकवत आहेत.

त्यामुळे सावध राहण्याखेरीज कोणताही पर्याय नाही. कारण छोटीशी चूकदेखील लाखो रुपयांच्या भुर्दंडाला कारणीभूत ठरू शकते. एखादा कॉल उचलणं हेदेखील या भुर्दंडाचं कारण ठरू शकतं. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी कोणते फोन कॉल्स उचलू नयेत, याबद्दल सरकारने काही मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

सायबर गुन्हेगार फोनवर कॉल करून नागरिकांची खासगी माहिती चोरतात किंवा त्यांचा फोन हॅक करतात. त्यामुळे त्या माध्यमातून सायबर क्राइम होत आहे. म्हणूनच केंद्रीय दूरसंचार विभागाने आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट करून नागरिकांना सायबर गुन्ह्यापासून बचाव कसा करायचा, याबद्दलच्या मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. देशातल्या सर्व मोबाइल युझर्ससाठी या सूचना करण्यात आल्या आहेत.

दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे, की अज्ञात इंटरनॅशनल नंबर्सवरून आलेले कॉल उचलू नयेत, अशी सूचना केली आहे. अशा प्रकारे इंटरनॅशनल नंबर्सवरून येणारे कॉल्स इंटरनेट जनरेटेड असतात. सायबर गुन्हेगार या नंबर्सवरून युझर्सना कॉल करतात. तसंच, आपण दूरसंचार विभाग किंवा ट्रायचे अधिकारी असल्याचं भासवतात. कोणीही सामान्य माणूस त्यांच्या बोलण्याला भुलतो आणि आपली माहिती देतो. त्यानंतर सायबर गुन्हा घडतो.

दूरसंचार विभागाने आपल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे, की इंटरनॅशनल फ्रॉड कॉल्सपासून वाचण्यासाठी आधी थांबून विचार केला पाहिजे. म्हणजे आपण त्याला बळी पडणार नाही. सर्वसाधारणपणे असे फ्रॉड इंटरनॅशनल कॉल्स +77,+84,+85,+86,+87,+89 अशा आकड्यांनी सुरू होणाऱ्या नंबर्सवरून येतात. ग्राहकांनी लक्षात ठेवावं, की दूरसंचार विभाग किंवा ट्राय कधीही अशा प्रकारच्या नंबरवरून कॉल करत नाही.

त्यामुळे अशा अज्ञात नंबर्सवरून येणारे कॉल्स उचलूच नयेत. चुकून उचलले गेले, तरी त्यांना आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. तसंच, Chakshu (चक्षू) या पोर्टलवर अशा नंबर्सची तक्रार दाखल करावी, असं आवाहनही दूरसंचार विभागाने सर्वांना केलं आहे. दूरसंचार विभागाला अशी माहिती मिळाल्यास असे नंबर्स ब्लॉक करण्याची कारवाई करण्यास त्यांना मदत होऊ शकेल. त्याचा उपोयग सर्व नागरिकांनाच होईल.