मुंबई:- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण सहा आमदारांना विधान परिषदेत जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
याबाबत महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयातून अधिसूचना काढण्यात आली आहे. मात्र प्रतिबंध गंभीर कारणांमुळे घालण्यात आलेले नसून सहाही विधान परिषद सदस्य हे आता विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आल्याने महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाने हा निर्णय घेतला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह नागपूरचे प्रवीण दटके, आमश्या पाडवी, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. हे सर्व 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत निवडून आले आहेत. ते आता विधानसभेत दाखल होणार आहेत. नियमानुसार एकावेळी एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही. त्यामुळे 23 नोव्हेंबरपासून या सर्व आमदारांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
एका व्यक्तीस दोन्ही सभागृहाचे सदस्य होता येत नाही
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभेतून निवडणूक जिंकले. तर भाजपचे गोपीचंद पडखळकरांनी जत विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. भाजपचे प्रवीण दटके यांनी नागपूर मध्य विधानसभेतून निवडणूक जिंकली. शिंदे गटाचे आमश्या पाडवी अक्कलकुवा मतदारसंघातून विजयी झाले. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातून बाजी मारली. तसेच भाजपचे रमेश कराड यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत रमेश कराड यांनी विजय मिळवला.