चंद्रपूर:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील भरती प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्यावर आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे मनोज पोतराजे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
शनिवारी उपोषणाचा तिसरा दिवस होता, या आंदोलनाची दखल घेत भाजप ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष संजय गात्ते यांनी उपोषण करणार्या पोतराजे यांची भेट घेतली.
सिडीसीसी बँक नोकर भरती मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी घटकातील उमेदवारांना आरक्षण दिले नसल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीद्वारे शासन प्रशासनाकडे जो पाठपुरावा केला व ही नोकर भरती रद्द करण्याची मागणी केली ती न्यायोचित असून, आम्ही सर्व भाजप ओबीसी सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचा या उपोषण आंदोलनाला पाठिंबा आहे, असे त्यांनी जाहीर केले.
यावेळी त्यांनी सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली व याप्रकरणी बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. येत्या 22 जानेवारीला मुंबई मंत्रालयात सिडीसीसी बँकेच्या भ्रष्ट नोकर भरती संबंधाने सहकार मंत्र्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नोकर भरतीवर स्थगिती आणू, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भाजप ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक जीवतोडे, प्रदेश सदस्य विनोद शेरकी आदींची उपस्थिती होती.