Kho Kho World Cup 2025: भारताची दमदार कामगिरी, महिला संघासह पुरूष संघही ठरला विश्वविजेता

Bhairav Diwase

नवी दिल्ली:- क्रीडा विश्वातून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. पहिलाचखो-खो विश्वचषक (Kho Kho World Cup 2025) भारतात खेळवला गेला आणि भारताच्या महिला-पुरूष दोन्ही संघांनी इतिहास घडवला आहे.

महिला खो खो संघानंतर पुरूष खो-खो संघानेही नेपाळवर अंतिम सामन्यात मात विश्वचषकावर नाव कोरलं. टीम इंडियाच्या महिला संघाने नेपाळला ३८ गुणांच्या फरकाने हरवले. महिला खो-खो संघाने नेपाळचा ७८-४० च्या फरकाने पराभव केला. तर पुरुष संघाने नेपाळविरुद्धचा सामना ५४-३६ च्या फरकाने जिंकला.

महिला खो-खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारी रोजी इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरूवात झाली. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला १७६ धावांच्या मोठ्या फरकाने हरवून भारतीय संघाने शानदार सुरुवात केली होती. सुरुवातीच्या सामन्यापासूनच भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवली होती. भारतीय संघाने तशीच कामगिरी अंतिम सामन्यातही केली आणि नेपाळला ७८-४० च्या फरकाने हरवून विश्वचषक ट्रॉफी जिंकली.

भारतीय महिला संघाने पहिल्या टर्नमध्ये आक्रमण केले आणि नेपाळच्या बचावपटूंना त्याचा प्रतिकार करता आला नाही, त्यानंतर भारताने सुरुवातीला ३४-० अशी आघाडी घेतली आणि येथून सामना त्यांच्या ताब्यात आला. भारतीय संघाने नेपाळला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या संघावर आक्रमण करण्याची पाळी आली असतांना त्यांना आघाडी मिळवता आली नाही. फक्त अंतर कमी करण्यात ते यशस्वी ठरले होते. तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करत भारतीय संघाने पुन्हा चमत्कार केला आणि नेपाळला सामन्यातून पूर्णपणे बाहेर काढले आणि 38 गुण मिळवले.
पुरूष संघाकडून नेपाळचा ५४-३६ च्या फरकाने पराभव…

खो-खो विश्वचषक २०२५ पुरुष स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाने नेपाळविरुद्ध चांगली सुरुवात केली, ज्यामध्ये त्यांनी पहिल्या डावातच २६ गुण मिळवले आणि नेपाळ संघाला खाते उघडण्याची संधीही दिली नाही. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळ संघाने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये त्यांनी एकूण १८ गुण मिळवले, परंतु टीम इंडियाने ८ गुणांची आघाडी कायम ठेवली. तर तिसऱ्या टर्नमध्ये भारतीय पुरुष खो-खो संघाने जबरदस्त पुनरागमन करत नेपाळला जेतेपदाच्या लढतीतून पूर्णपणे बाहेर काढले. भारतीय पुरुष खो-खो संघाने नेपाळविरुद्धच्या अंतिम सामन्याच्या पहिल्या तीन टर्नमध्ये आघाडी कायम ठेवली आणि त्यानंतर चौथ्या टर्नमध्येही चांगली कामगिरी करत ५४-३६ च्या फरकाने सामना जिंकला.

दरम्यान, विश्वचषक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही टीम इंडियाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.