उड़ान ॲकडमी व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपोषणाला पाठिंबा!
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत, ही भरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले. पण न्याय मिळाला नाही. त्यामुळे गुरूवार, 16 जानेवारीपासून दुपारी 12 वाजेपासून बँकेसमोरच आमरण उपोषणाला मनोज पोतराजे हे बसले आहे. आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून उड़ान ॲकडमीचे संचालक इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमरण उपोषणाला भेट देत आपला पाठिंबा जाहीर केला.
नोकरी भरतीत गैरव्यवहार होत असल्याचे आरोप करीत, बँकेची नोकर भरती घेताना मागासवर्गीय एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण हटवून संचालकांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय केला आहे. या नोकर भरतीची चौकशी करून आरक्षण लागू करावे व नंतरच नोकर भरती प्रक्रिया राबवावी यासाठी आरक्षण बचाव संघर्ष समिती 2 जानेवारीपासून बेमुद्दत साखळी ठिय्या आंदोलन करीत आहे. परंतु, स्थानिक जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक यांच्यासह सहकार आयुक्त, सचिव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देऊनसुद्धा या ठिय्या आंदोलनाची दखल घेण्यात न आल्याने आता आमरण उपोषण आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
मागण्या
बँकेच्या कालबाह्य संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमा, नव्याने निवडणूक घ्यावी, न्यायालयाचा निकाल येईस्तोवर भरती प्रक्रिया थांबविण्यात यावी, आरक्षणाबाबत न्यायालयातील याचिकेची अंतिम सुनावणी होईपर्यंत भरती प्रक्रिया थांबवावी, 2018 चा शासन अध्यादेश बँकेच्या नोकर भरतीत लागू करावा, आयटीआय कंपनीने घेतलेल्या परीक्षेतील सर्व परीक्षार्थीचे गुणांसह यादी प्रकाशित करावी, नोकर भरती प्रक्रियेत झालेल्या गैरव्यवहाराची एसआयटीद्वारे चौकशी व्हावी, अशा माण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.