चंद्रपूर:- कोरपना तालुक्यातील सोनुर्ली जवळील एमएस कापूस जिनींगला लागलेल्या आगीत सुमारे 200 गाठी जळून खाक झाल्या असून लाखोंचे नुकसान झाले आहे. शार्टसर्कीटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावाजवळ एमएस कापूस जिनिंग आहे. या जिनिंग मध्ये सीसीआय व प्रायव्हेट कापूस खरेदी सुरू होती. कापूस खरेदी केल्यानंतर कापसाच्या गाठी तयार करून पाठविलेल्या जातात त्यामुळे आज सकाळी गाठी तयार करण्याचे काम सुरू होते. दरम्यान अचानक कापसाच्या गाठींना आग लागली. सदर आगीची घटन कामगारांच्या लक्षात येताच कामगारांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. लगेच गडचांदूर नगरपरिषद, अल्ट्राटेक सिमेंट, दालमिया सिमेंटच्या 3 अग्निशामक बोलविण्यात आले. अग्निशामक वाहनाच्या मदतीने आग विझविण्यात आली असून यात सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नाही. आगीत कापसाच्या सुमारे 200 गाठी जळून खाक झाल्याची माहिती आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती आहे.