Mobile screen gard: 100 रुपयांचं मोबाईल स्क्रीन गार्ड, वाद आणि सपासप वार करत तरूणाची हत्या

Bhairav Diwase


सांगली:- 100 रुपयांच्या मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीवरून तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची अतिशय धक्कादायक घटना सांगलीत घडली आहे. चार तरूणांनी चाकू आणि कोयत्याने वार करत त्या तरूणाचा खून केला.


सांगलीतील बस स्थानकाजवळ असलेल्या एका मोबाईल शॉपमध्ये ही घटना घडली असून त्यामुळे संपूर्ण शहरात प्रचंड खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सध्या संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विपुल अमृतपुरी गोस्वामी असं मृत तरूणाचं नाव आहे. तो सांगली शहरातील मध्यवर्ती बस स्थानकावरील मोबाईल शॉपमध्ये काम करत होता. घटनेच्या दिवशी मोबाईलचं स्क्रीन गार्ड खरेदी करण्यासाठी काही तरूण दुकानात आले होते. तेव्हा विपुलने त्यांना मोबाईलच्या स्क्रीन गार्डची किंमत 100 रुपये इतकी सांगितली. मात्र ते खरेदी करण्यासाठी आलेल्या तरूणांनी तेच मोबाईल स्क्रीन गार्ड हे 50 रुपयाला मागितलं आणि वाद घालण्यास सुरूवात केली. बघचता बघता त्यांचा वाद चांगलाच वाढला. संतापलेल्या तरूणांनी विपुल याच्यावर कोयता आणि चाकूने सपासप 20 ते 25 वार केले. यामध्ये विपुल हा जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

दुकानात झालेल्या या हत्याकांडाने सगळेच हादरले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह फौजफाटा घटनास्थळी दाखल झालं. त्यानंतर संदीप घुगे यांनी घटनेचा आढावा घेत तातडीनं तपास करण्याच्या सूचना दिल्या. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

छोटासा वाद जीवावर बेतला

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भैरवनाथ मोबाईल शॉपी इथं काही तरुण मोबाईल स्क्रीन गार्ड खरेदीसाठी गेले होते. यावेळी खरेदी करणारे अल्पवयीन मुले आणि मोबाईल दुकानदार विपुल गोस्वामी यांच्यात मोबाईल स्क्रीन गार्डच्या दरावरून वाद झाला. यानंतर अल्पवयीन तरुणांनी विपुल गोस्वामीवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. यात विपुल गंभीर जखमी झाला. मात्र, काही वेळातच विपुलचा जागीच मृत्यू झाल, असे शहर पोलीस उपाधीक्षक विमल एम. यांनी सांगितलं.