वडील मोबाईल बघताना 5 वर्षांचा मुलगा कारखाली आला; घटना CCTV मध्ये कैद

Bhairav Diwase

नाशिक:- 'नजर हटी दुर्घटना घटी' हे शब्द तुम्ही प्रवासादरम्यान रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या फलकावर लिहिलेले अनेकदा पाहिले असतील. मात्र नाशिकमध्ये अशाच पद्धतीची एक विचित्र घटना घडली असून ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. वडील मोबाईलमध्ये पाहण्यात व्यस्त असतानाच एक पाच वर्षाचा चिमुकला कारखाली चिरडला गेला. या मुलाचा मृत्यू झाला असून सध्या या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

नक्की घडलं काय आणि कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्देवी घटना नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन या पंचतारांकित हॉटेलच्या पार्कींगमध्ये घडली. मयत मुलाची ओळख पटली असून त्याचं नाव ध्रुव अजित राजपूत असं आहे. हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळून वडिलांसोबत परत जात असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. मयत चिमुरड्याचे वडील अजित राजपूत हे मुलगा ध्रुव आणि मुलगी हर्षदाला हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्याठी घेऊन आले होते. मात्र खेळून झाल्यानंतर घराकडे जात असताना अजित यांचं लक्ष मोबाईलमध्ये होते. तितक्यात ध्रुव वडिलांचा हात सोडून लॉबीमध्ये जाताना ईनोव्हा गाडीने त्याला चिरडलं. 

मारहाण अन् पळ काढला...

व्हिडीओमध्ये ध्रुवला गाडी दिसल्यानंतर त्याने थांबण्याचा प्रयत्न केला असता तो घसरुन गाडीच्या डाव्या बाजूच्या चाकासमोरच पडला आणि चाक त्याच्या अंगावरुन गेलं. मुलाच्या अंगावरुन कार गेल्याचं लक्षात आल्यानंतर अजित यांना धक्काच बसला. ते मुलाला उचलण्यासाठी पुढे धावले. काही क्षणांमध्ये घटनास्थळावर लोकांची गर्दी झाली. ध्रुव बेशुद्ध झाल्यासारखा निपचित झाल्याने अजित चांगलेच संतापले. दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इनोव्हाच्या चालकाला मारहाण करण्यात आल्याचंही दिसत आहे. 

मद्यपान केल्याचा आरोप

ज्या इनोव्ह गाडीने ध्रुवला उडवले सदर गाडीचा चालक या मुलाला हॉस्पिटलमघ्येच सोडून पाळाल्याचा आरोप केला जात आहे. ज्या गाडीने या चिमुरड्याला चिरडले तो दारू पिलेला होता असा अशी तक्रार मयत मुलाच्या वडिलांनी पोलिसात केला आहे. नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.