Murder News: आचाऱ्याने भाजी चिरायच्या चाकूने वेटरचा गळा कापला
शुक्रवार, फेब्रुवारी ०७, २०२५
पुणे:- पुण्याच्या चाकण भागामध्ये हॉटेलच्या वेटरची हत्या करण्यात आली आहे. हॉटेलमध्ये स्वयंपाक करणाऱ्या आचाऱ्याने भाजी चिरण्याच्या चाकूने वेटरची हत्या केली. चाकण जवळ असलेल्या खराबवाडी येथे सारा सिटी रोडलगत असणाऱ्या हॉटेलमध्ये या दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी झाली. या वादावादीमध्ये आचाऱ्याने विजय पांचाळे या वेटरचा भाजी चिरतो त्या चाकूने गळा कापला.
हॉटेलमध्ये हत्या झाल्याने खराबवाडी गावात मोठी खळबळ माजली. उदय उर्फ सुनिल गिरी असे आरोपीचे नाव असून पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट-3 च्या पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली आहे.
शुक्रवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांच्या सुमारास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराबवाडी येथे हॉटेल ऐश्वर्या बार ऍण्ड रेस्टॉरंटमधील कामगारांच्या खोलीत हत्या करण्यात आली. विजय विनायक पांचाळे वय 35 राहणार अमरावती असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. विजय पांचाळे हे या हॉटेलमध्ये स्वयंपाकीचं काम करत होते.
विजय पांचाळे आणि आरोपी उदय प्रकाश गिरी (वय 35 वर्ष) यांच्यात कामावरून वाद झाले. या वादातून उदय प्रकाश गिरी याने भाजी कापायच्या सुरीने विजय पांचाळेचा गळा चिरला. या हल्ल्यात विजय पांचाळे गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात नेण्याआधीच विजयचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आरोपी उदय प्रकाश गिरी याला पोलिसांनी लागलीच ताब्यात घेतलं.