सख्ख्या भावांनी १७ वर्षाच्या मुलाची केली हत्या
वर्धा:- सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट केलेल्या स्टोरीवरून झालेल्या वादात नजिकच्या पिंपळगाव (माथनकर) येथील दोन भावंडांनी स्थानिक संत कबीर वार्ड येथील हिमांशू चिमणे या 17 वर्षीय मुलाचा छाती व गळ्यावर चाकुचे वार करीत निर्घृण खून केला. सदर घटना शनिवार 8 रोजी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान पिंपळगाव हद्दीतील बारामती ले आऊटमध्ये घडली.
मानव जुमनाके (21) व अनिकेत जुमनाके (23) अशी या मारेकर्या सख्ख्या भावंडांची नावे आहेत. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतक हिमांशू चिमणे याने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टवरून मागील दीड महिन्यांपासून या युवकांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान, शनिवारी हा वाद मिटविण्याचे सांगून मानव जुमनाके व अनिकेत जुमनाके यांनी हिमांशूला घटनास्थळी बोलाविले होते. मात्र, भावंडांना वाद मिटवायचा नसून त्याचा काटा काढायचा होता, ही बाब हिमांशूच्या लक्षात आली नव्हती. जुमनाके भावंडांनी बोलावलेल्या ठिकाणी हिमांशू आला. मात्र, त्यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर झटापटीत झाले. यावेळी भावंडांनी हिमांशूवर चाकूने वार केले. झालेल्या झटापटीत अनिकेत जुमनाके हा सुद्धा गंभीर जखमी झाला. त्याला वर्धा येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
या घटनेपुर्वी जुमनाके बंधूंनी हिमांशूच्या घरी जाऊन वाद केला होता. यावेळी एकमेकांना मारहाणसुद्धा केली होती, हे विशेष. हा वाद मिटविण्यासाठी जुमनाके बंधूंनी हिमांशूला बारामती लेआउटजवळ बोलावले होते. मात्र, वाद मिटविण्याऐवजी हाणामारी आणि नंतर खून करण्यापर्यंत वाद उफाळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. झटापटीत अनिकेत गंभीर जखमी झाल्याने त्याला वर्धा येथील रुग्णालयात हलविले तर मानव जुमनाके याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहेत.