चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात बुधवारी (५ मार्च) न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला ५० धावांची पराभूत केले. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर हा सामना झाला. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला असल्याने त्यांनी अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे. यामुळे अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय संघाने मंगळवारी (४ मार्च) ऑस्ट्रेलियाला पहिल्या उपांत्य सामन्यात पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले आहे.
न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी २००० आणि २००९ साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने स्थान मिळवले होते. तसेच भारतीय संघ पाचव्यांदा, तर सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात खेळणार आहे. भारताने यापूर्वी २०००, २००२, २०१३ आणि २०१७ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला आहे.
२५ वर्षांनंतर पुन्हा आमने-सामने
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की २५ वर्षांपूर्वी म्हणजे २००० साली भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहचले होते. त्यावेळी केनियात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडने भारताला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आता यानंतर २५ वर्षांनी पुन्हा हे दोन संघ अंतिम सामन्यात आमने-सामने असणार आहेत.
कुठे व केव्हा होणार अंतिम सामना
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे मुख्य आयोजक पाकिस्तान क्रिकेट बोर्ड असले, तरी ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलने होत आहे. भारतीय संघ अंतिम सामना खेळणार असल्याने हा अंतिम सामना दुबईमध्ये आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल.
९ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड दुबईत अंतिम सामना खेळणार आहेत. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता हा सामना सुरू होईल. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात होणारा अंतिम सामना टीव्हीवर भारतात स्टार स्पोर्ट्सच्या चॅनेल्सवर, तसेच स्पोर्ट्स १८ चॅनेल्सवर पाहाता येणार आहे. तसेच जिओहॉटस्टार या ओटीटी ऍप किंवा वेबसाईटवर देखील हा सामना लाईव्ह पाहाता येईल.
दरम्यान, यापूर्वी न्यूझीलंडने २००० साली एकदा, तर भारताने २००२ साली श्रीलंकेसह संयु्क्तरित्या आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. त्यामुळे आता न्यूझीलंडला दुसऱ्यांदा, तर भारताला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची संधी असणार आहे.