चंद्रपूर जिल्ह्यातील एका साध्या कुटुंबातील तरुण, मनोज पोतराजे. मूळचे भद्रावती तालुक्यातील कोंढा बरांज गावचे. वडील वेकोलीत कामाला, त्यामुळे वास्तव्य चंद्रपूर शहरातील इंदिरा नगर येथे. मनोजच्या आयुष्याचा प्रवासही एका लढवय्या कार्यकर्त्याचा आहे.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच सामाजिक कार्याची ओढ लागली. समाजातील अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची जिद्द त्याच्या मनात घर करू लागली. याच दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या सामाजिक व विकास कार्याने तो प्रभावित झाला आणि राजकारणाच्या दिशेने पावले टाकली. भाजपमध्ये एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश केला. निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवारी घेतली नाही, पण पक्षाच्या प्रचार व संघटनात आपली भूमिका बजावत राहिला. त्याच्या कार्यतत्परतेमुळे पक्षाने त्याच्यावर जबाबदारी दिली ती भाजप ओबीसी सेलच्या शहराध्यक्षपदाची.
मनोज पोतराजे हे चंद्रपूर जिल्ह्यातील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकरभरती प्रक्रियेत झालेल्या अनियमितता आणि आरक्षणाच्या नियमांचे उल्लंघन याविरोधात आवाज उठविला आहे. १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांनी आमरण उपोषण सुरू केले होते, ज्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर, २९ जानेवारी रोजी मनोज पोतराजे यांनी उपोषण समाप्त केले. या प्रकरणात पुढील चौकशी सुरू आहे, आणि मनोज पोतराजे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.