Railway Accident: RPF ची परीक्षा देऊन येत असताना काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Bhairav Diwase


हिंगोली:- रेल्वे मध्ये चढताना पाय घसरून रेल्वे खाली येऊन तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ गजानन रनवर ( वय- अंदाजे २१) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.


अधिक माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असलेला सोमनाथ हा आपल्या मित्रांसोबत आरपीएफ ची परीक्षा देण्यासाठी हैद्राबादला गेला होता. ही परीक्षा देऊन घरी परतण्यासाठी त्याने पूर्णा पॅसेंजर या गाडीतून प्रवास सुरू केला. सोमनाथ रेल्वेतून प्रवास करत होता. रेल्वेच्या बाथरुममध्ये दुर्गंधी येत असल्याने लघुशंकेसाठी त्याचा वापर न करता माळसेलू रेल्वे स्थानकावर गाडी काही काळासाठी थांबली होती. तिथे खाली उतरला.



मात्र तो खाली उतरल्यानंतर तात्काळ रेल्वे सुरू झाली हे पाहताच सोमनाथने गाडी पकडण्यासाठी धाव घेतली. मात्र रेल्वेमध्ये घाईघाईने चढत असताना अचानक रेल्वेच्या दरवाजाच्या पायरी वरून त्याचा पाय निसटला आणि थेट सोमनाथ रेल्वेच्या रुळावर पडला. सेकंदातच रेल्वेखाली तो अडकला होता. हा प्रसंग त्याच्या मित्रांच्या डोळ्यासमोर घडला त्यांनी आरडा-ओरड केली. मात्र क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या अपघातात सोमनाथचा जागीच मृत्यू झाला.