चंद्रपूर:- महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय म्हणून महाराष्ट्र पोलिसांनी महिलांसाठी मोफत राइड योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत महिलांना रात्री दहा ते सकाळी सहा या वेळेत घरी सोडायला पोलिसांचे वाहन मोफत मिळेल, असे नमूद करून तो मेसेज सर्वत्र प्रसारित होत आहे. पण, अशी कोणतीही योजना सध्या सुरू नसल्याचे चंद्रपूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर महिलांना घरी जायला रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यास त्यांच्या घरी सोडायला पोलिसांचे वाहन त्याठिकाणी येईल, असा तो मेसेज अनेकांच्या व्हॉट्सॲप स्टेटसला पाहायला मिळत आहे. अनेकजण तो मेसेज खात्री न करताच बाकीच्या ग्रुपवर देखील प्रसारित करीत आहेत. पण, तशी कोणतीही योजना कार्यान्वित नाही, असे स्पष्टीकरण खुद्द चंद्रपूर जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांनी दिले आहे. अशा अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, सोशल मीडिवरील कोणताही मेसेज, व्हिडिओ, फोटो प्रसारित करताना त्याची खात्री करावी, अन्यथा फसवणूक होवू शकते असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे.
सोशल मीडियातील व्हायरल तो मेसेज काय?
महाराष्ट्र पोलिसांनी मोफत राइड योजना सुरू केली आहे, जिथे महिलांसाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत एकट्या घरी जाण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नाही, त्यांच्यासाठी ही योजना आहे. महिला पोलिस हेल्पलाइन क्रमांकावर १०९१ किंवा ७८३७०१८५५ यावर कॉल करू शकतात आणि वाहन मागू शकतात. हा क्रमांक २४ तास कार्यरत असेल. कंट्रोलरूमचे वाहन किंवा जवळपासचे पीसीआर वाहन, एसएचओ वाहन येईल आणि तिला सुरक्षितपणे घरी सोडेल. हे मोफत केले जाईल, तुमच्या ओळखीच्या प्रत्येकाला हा संदेश पाठवा, असा हा मेसेज सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. मात्र, ती अफवा असल्याचे चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी सांगितले.