सोलापूर:- सोलापूर जिल्ह्याच्या जिंतूर रोड रेल्वे स्थानकाजवळ एक मन हेलावून टाकणारी घटना उघडली आहे. इथं एका ड्युटीवर असणाऱ्या जवानाचा दुर्दैवी अंत झाला आहे. संबंधित जवान जिंतूर रोड इथं पेट्रोलिंग करत होते, यावेळी अचानक समोरून आलेल्या एक्स्प्रेस ट्रेननं त्यांना उडवलं आहे. या अपघातात संबंधित जवानाचा जागीच मृत्यू झाला आहे.
श्रीकांत वाघमारे असं मृत पावलेल्या जवानाचं नाव आहे. ते माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील रहिवासी असून आरपीएफमध्ये काम करतात. घटनेच्या दिवशी शनिवारी ते नेहमीप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील जिंतूर रोड रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी भरधाव वेगानं आलेल्या केके एक्सप्रेसने त्यांना उडवलं आहे. हा अपघात इतका भयानक होता की श्रीकांत यांचा जागीच मृत्यू झाला.
ही अपघाताची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दौंड लोहमार्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. हा अपघात नेमका कसा घडला? त्यांना एक्स्प्रेस ट्रेन येताना कशी काय दिसली नाही? याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत. श्रीकांत वाघमारे यांच्या पाश्चात आई पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. एका तरुण जवानाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.