जालना:- जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली असून, 1 लाख 80 हजार रुपयांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड आणि कॉन्स्टेबल गोकुळदास देवळे यांनी एका वाळू वाहतूकदाराला दाखल गुन्ह्यात मदत करण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केली होती. संबंधित वाहतूकदाराकडून एका खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून ही रक्कम स्वीकारली जात होती.
याच दरम्यान, बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने आष्टीतील एका ज्यूस सेंटरवर कारवाई करत आरोपींना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिघांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस दलातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.