चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात एका पेट्रोल पंपावर ग्राहकासोबत झालेल्या वादाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पेट्रोल पंपावर ग्राहकाला मिळालेल्या वागणुकीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या बियाणी पेट्रोल पंपावरील ही घटना आहे. पेट्रोल भरल्यानंतर संबंधित व्यक्तीने 10 रुपयाचे 9 शिक्के दिले. मात्र, पेट्रोल पंपावरील महिला कर्मचाऱ्यांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला आणि 'आमच्या पंपावर नाणी चालत नाहीत, फक्त रोकडच स्वीकारली जाते', असे सांगितले. ग्राहकाकडे नोटा नसल्याने कर्मचाऱ्यांनी त्याच्या वाहनातील संपूर्ण पेट्रोल काढून टाकले. हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, पंप व्यवस्थापनाच्या या अडेलतट्टू धोरणाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.,