Vijay wadettiwar : 'धानोरकरांच्या 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात फटका

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी विधानसभा निवडणुकी आधी जे वक्तव्य केलं, त्यामुळे काँग्रेसला (Congress) विदर्भात मोठा फटका बसला. काँग्रेस विरोधात विदर्भातील गैर कुणबी, ओबीसी एकवटला आणि त्यांनी भाजपला मतदान केल्याने विदर्भात 40 जागा जिंकण्याची शक्यता असलेली काँग्रेस अवघ्या 10 जागांवर आली. असा खळबळजनक दावा काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर अशी किनार असलेल्या या प्रकरणात पहिल्यांदाच वडेट्टीवार यांनी जाहीरपणे हे भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.


विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी येथील कुणबी समाज संमेलनात केलेल्या वक्तव्याचा वडेट्टीवारांनी संदर्भ देत भाष्य केलंय. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात फक्त कुणबी उमेदवार निवडून द्या, अल्पसंख्याक समाजातील आमदार नको. असं म्हणत धानोरकर यांनी अप्रत्यक्षपणे वडेट्टीवारांना पराभूत करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र ब्रह्मपुरीमध्ये जे काही वक्तव्य झालं त्यामुळे विदर्भातला गैर कुणबी ओबीसी मतदार एकवटले आणि ते भाजपकडे गेल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

 वडेट्टीवार यांच्या मते कुणबी समाज सर्वच पक्षात आहे. विधानसभा निवडणुकीत तो ज्या पक्षात होता त्याच पक्षात राहिला. मात्र धानोरकर यांच्या वक्तव्यामुळे कुणबी सोडून इतर ओबीसी समाज एकवटला आणि तो भाजपकडे गेला, त्यामुळे आम्ही विदर्भात 40 सीट जिंकणार होतो, त्या अगदी 10 वर आल्या आणि नाना पटोले यांची जागा सुद्धा धोक्यात आल्याचा धक्कादायक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.