Sudhir mungantiwar: नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेल

Bhairav Diwase

चंद्रपूर:- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी बाबूपेठ येथील नवीन उड्डाण पुलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावरण करताना मनापासून आनंद झाला. हा नवीन उड्डाणपूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबूपेठ येथील उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या उड्डाण पुलाच्या नामफलकाचे अनावरण आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हा उड्डाण पुल व्हावा, अशी बाबूपेठ येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. या पुलासाठी मी ६५ कोटी रुपये मंजूर करू शकलो, यासाठी मी भाग्यवान आहे. हा पूल बाबूपेठवासीयांची चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेल, असा मला विश्वास आहे.’

भाजपा महानगरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व येथे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘लंडनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला, ही माझ्या आयुष्यातील एक सौभाग्यशाली घटना आहे. १९२०-२१ मध्ये डॉ.बाबासाहेब लंडनमधील ज्या निवासस्थानी मुक्कामाला होते, तेथे जाऊन जनसेवेची ऊर्जा घेऊन येता आले, यासाठी स्वतःला नशीबवान समजतो.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दोन जिल्ह्यांमध्ये दीक्षा दिली, त्यात चंद्रपूरचा समावेश आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मला स्वतःला मंत्री म्हणून डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. १२५व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनके वास्तू निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला. दीक्षाभूमीसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता आला. आज मला त्यांच्या नावाने उड्डाणपुलाच्या नामफलकाचे उद्घाटन करता आले. या सर्व घटना माझ्यासाठी ऊर्जा देणाऱ्या आहेत, अश्या भावनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

महामानवाला सेवेतून अभिवादन

चंद्रपूर रेल्वे स्टेशनजवळील उडिया मोहल्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवबौद्ध पंचशील मंडळ व साहेब मित्रमंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले. बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रमाला आ. श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच पडोली येथे पाणपोई व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सेवेचं रूप, समतेचं पूजन करत दुर्गापूर, नवरत्न बुद्ध विहार येथे आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुष्पांजली अर्पण केली. चंद्रपूर आंबेडकर चौक येथेही आ. मुनगंटीवार यांनी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी पाणी व बिस्कीट वाटप उपक्रमात आ. मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.